१२व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

उपक्रम प्रमुखांची बैठक उत्साहात

छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा साहित्य परिषद, शाखा अंबाजोगाईच्या वतीने 12 व 13 डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे 12 वे अंबाजोगाई साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक इंदुमती जोंधळे व स्वागताध्यक्ष शकुंतला लोमटे या आहेत. या दोन दिवसीय साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, संमेलन आयोजक उपक्रम प्रमुखांची बैठक एमआयटी संकुल बीड बायपास येथे स्वागताध्यक्ष शंकुतलाताई लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दिनांक 15 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली.

संमेलनात परिसंवाद, कथाकथन, काव्यवाचन, खुले कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, कथास्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, पुस्तकांच्या मुखपृष्ठांचे अनोखे प्रदर्शन आदी विविध कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाच्या निमिताने विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान,अंबाजोगाईच्या आठवणींची स्मरणिका प्रकाशित  करण्यात येणार आहे. स्मरणिका उपक्रम प्रमुख विलास इंगळे यांनी सांगीतले की, लेखन-प्रतिसाद चांगला असून आतापर्यंत एकूण ८० लेख आले आहेत. एकूण २०० पानांची स्मरणिका तयार होईल.

मुखपृष्ठांचे प्रदर्शन, परिसर सजावट:
या उपक्रमाचे प्रमुख रामेश्वर सेलूकर यांनी कमानीबाबत सांगितले की, वळण रस्त्यावर, मुख्य प्रवेशद्वार (गेट क्र १) इमारतीचे प्रवेशद्वार अशा तीन कमानी लागतील. चित्र प्रदर्शनाचे प्रमुख कबीरानंद राजहंस यांनी सांगीतले की, चित्रकार दिलीप बडे यांची एकूण १० चित्रे तयार करून हस्तगत केली आहेत. दिवगंत चित्रकार पी. एन. सोनकांबळे व कोल्हापूर येथे रहात असलेले चित्रकार राजन रामदासी (मूळ अंबाजोगाई) यांची चित्रे प्राप्त झाली आहेत. छायाचित्र प्रदर्शनासाठी स्टॅन्डीचा वापर करायचा झाल्यास ए फोर साइजमध्ये येणाऱ्या छायाचित्रांची संख्या पाहून संबंधीत तज्ज्ञ व्यक्तिशी चर्चा करुन मांडणी करण्यात येणार आहे. पुस्तक प्रदर्शन- संमेलनाच्या निमित्ताने भरवण्यात येणाऱ्या पुस्तक प्रदर्शनाबाबत, अरुण थोरात यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर येथील विद्या बुक्स, साकेत प्रकाशन, विठ्ठल ग्रंथ भांडार व ग्रामगीता औसा यांच्याशी संपर्क झाला आहे. रामकृष्ण, रजत, ऋतबा आणि कैलास पब्लिकेशन छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संपर्क करण्यात येणार आहे. राजहंस व ग्रंथतुला प्रकाशन यांच्याशी अभिजीत जोंधळे यांनी संपर्क करण्याची सूचना यावेळी केली.

कथालेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

अमर हबीब यांनी परीक्षकांकडून प्राप्त झालेला कथालेखन स्पर्धेचा निकाल जाहीर केला. त्याची चाळणी पद्धती सांगीतली. पहिल्या तीन परीक्षकांनी अनक्रमे तिलोत्तमा पतकराव, दैवशाली म्हेत्रे व सिमा जाधव यांनी कथा प्रकारात मोडणाऱ्या आणि विषयाला धरुन असणाऱ्या कथा निवडल्या. त्या दुसऱ्या चाळणीकडे म्हणजे परीक्षक बालाजी सुतार आणि संध्या सोळंके शिंदे यांच्याकडे पाठवल्या. त्यांनी स्वतंत्रपणे परीक्षण करून प्रथम, व्दितीय, तृतीय अशा कथांची निवड केली. प्रथम क्रमांकाची कथा दोन्ही परीक्षकांची एकच निवडली होती. त्यामुळे पाच कथा अतिम चाळणी परीक्षक म्हणजे प्रा.डॉ. दासू वैद्य यांच्याकडे पाठवल्या. त्यांनी पाठवलेला निकाल पुढीलप्रमाणे- प्रथम क्रमांक – सुमन इंगोले (पासोडी), व्दितीय क्रमांक – अलका तडकलकर (जीवापाड जीव ), तृतीय क्रमांक – अभिषेक कातकडे (अंबाजोगाईच्या सावलीत).

परीक्षकाकडून आलेल्या पहिल्या पाचपैकी ज्या दोन कथा राहिल्या त्यांची संयोजन समितीच्या स्तरावर निर्णय घेऊन उत्तेजनार्थ म्हणून निवड करण्यात आली. त्यामध्ये दता वालेकर (हत्तीखाना) व कल्पना लोहिया (मिरा) आहेत. बक्षिसाची रक्कम 5000, 3000, 2000 उत्तेजनार्थ प्रत्येकी 500 अशा प्रकारे 11 हजार रुपयांची रोख बक्षिसे असल्याची माहिती गोरख शेंद्रे यांनी दिली. स्पर्धेच्या संयोजक तिलोत्तमा पतकराव व सर्व परीक्षक व या स्पर्धेचे मार्गदर्शक अमर हबीब यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. या सर्व बक्षीसपात्र कथाकारांना समारोप सत्रात सन्मानपूर्वक बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे.

संमेलनाचे स्वागत कक्ष व स्वयंसेवक यासंदर्भात अरुण थोरात व महावीर भगरे यांनी माहिती दिली. तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख परमेश्वर गित्ते यांनी सांगितले की, सांस्कृतिक कार्यक्रमाचे तीन भागाचे नियोजन झाले आहे. आंब्याचे गोंधळी – दासू वैद्य संकल्पना व संवादक राहतील. दिलीप घारे व सोनाली भगरे त्यात भूमिका करतील. गायन- अमोल देरामुख हे राम मुकादम यांच्या ‘बेहोश चालताना’ या संग्रहातील गझल सादर करतील, शैला लोहिया यांची कविताही यावेळी सादर करण्यात येणार आहे. याबरोबरच बशर नवाज यांचीही गझल सादर होणार आहे. नवोन्मेश अंतर्गत रॅपचे सादरीकरण डॉ. वैभव काळे व ओंकार रापतवार करतील. उदघाटन सत्राची सुरुवात क्रांती एडके व अविष्कार एडके हे बहीणभाऊ अंबाजोगाईचे गौरवगीत गाऊन करतील.

खुले कवी संमेलन यासंदर्भात बलराज संघईनी पस्तीस कवींची नावे नोंद झाल्याचे सांगीतले. नोव्हेंबरच्या ३० तारखेपर्यंत नाव नोंदणी करण्यात येईल. संमेलनपूर्व ऑनलाईन साहित्य संमेलन उपक्रम प्रमुख अश्विनी चौधरी यांनी परिसंवाद, बातचीत कथाकथन, कवीसंमेलन, मुक्तपीठ याबाबत माहिती दिली. तसेच मंचव्यवस्थेची माहिती संजय पिपळकर यांनी दिली. कार्यक्रम पत्रिका व मोमेंटोची माहिती अमर हबीब यांनी दिली. बैठकीस स्वागताध्यक्ष शंकुतला लोमटे यांच्यासह मार्गदर्शक अमर हबीब, स्वागत समितीचे सचिव गोरख शेंद्रे, दगडू लोमटे, विलास इंगळे, परमेश्वर गित्ते, प्रभाकर आगळे, बलराज संघई, कबीरानंद राजहंस, रामेश्वर सेलूकर, संजय पिंपळकर, अरुण थोरात, महावीर भगरे, अश्विनी चौधरी, अभिजित जोंधळे उपस्थित होते.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *