अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे, स्वागताध्यक्षपदी शकुंतला लोमटे
छत्रपती संभाजीनगर: अंबाजोगाईकरांचे बारावे मराठी साहित्य संमेलन येत्या 12 व 13 डिसेंबर रोजी बीड बायपास येथील एमआयटी शैक्षणिक संकुल परिसरात होणार आहे. संमेलन आयोजनाच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली .
या बैठकीत संमेलनाध्यक्षपदी इंदुमती जोंधळे तर स्वागताध्यक्षपदी शकुंतला लोमटे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल स्वागताध्यक्ष शकुंतला लोमटे यांचा सत्कार मराठवाडा साहित्य परिषद अंबाजोगाई शाखेचे अध्यक्ष डॉ. राहुल धाकडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सचिव गोरख शेन्द्रे, शैलजा बरुरे, ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब, माजी संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. दासू वैद्य आदी उपस्थित होते
संमेलनाचे प्रास्ताविक करताना ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब म्हणाले की, हे गावाचे संमेलन आहे, येथे कोणताही भेदाभेद नाही, आता हे संमेलन बहुभाषी व्हावे, असे सांगून अमर हबीब यांनी संमेलनाच्या निमित्ताने होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती यावेळी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत दासू वैद्य, डॉ. शिरीष खेडगीकर, प्रा. दिलीप घारे, प्रा. डॉ. वि. व. धारुरकर, सुरेंद्र पाटील, अमॄत महाजन, बलराज संघई, विलास इंगळे आदींनी सहभाग घेतला.
संमेलनस्थळ आणि सभागृहास दिवंगत सुप्रसिद्ध कलोपासक आणि मूळचे अंबाजोगाईकर चित्रकार दिलीप बडे आणि नाट्य कलावंत नाट्यलेखक डॉ. चंदू सोमण यांची नावे दिली जाणार आहेत. एमआयटी परिसरात 12 डिसेंबर रोजी वृक्षारोपण करून अभिनव पद्धतीने संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याबरोबरच अंबेजोगाई: काल-आज- उद्या या विषयावर परिसंवाद होणार आहे. खुले कविसंमेलन, निमंत्रितांचे कविसंमेलन, संमेलनाध्यक्षांची प्रकट मुलाखत, सांस्कृतिक कार्यक्रम, चित्रप्रदर्शन, स्मरणिका प्रकाशन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. 13 डिसेंबर रोजी साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे. नोकरी व विविध व्यवसायाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर व राज्यात विविध ठिकाणी स्थायिक झालेल्या मूळच्या अंबाजोगाईकरांनी या संमेलनास उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
०००००