पैठणीप्रमाणे जालन्यात ‘जालनाई ब्रँड’ चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

जालना : जालना जिल्ह्याची ओळख आता ‘सिल्क, सीड आणि स्टील’ अर्थात ‘ट्रिपल एस सिटी’ म्हणून निर्माण झाली असून, रेशीम उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्यात नव्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. कापूस आणि सोयाबीन या पारंपरिक नगदी पिकांना पर्याय म्हणून रेशीम शेतीला प्रोत्साहन देतानाच उत्पादनापासून प्रक्रिया, वस्त्रनिर्मिती, ब्रँडिंग आणि बाजारपेठेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी जालन्यात विकसित करण्यावर शासनाचा भर आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही अधिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध होऊन जालना देशातील महत्त्वाचे रेशीम केंद्र म्हणून पुढे येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

जालना येथे नव्याने उभारण्यात आलेल्या रेशीम बाजारपेठेच्या नवीन इमारत लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन तथा पालकमंत्री पंकजा मुंडे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री संजय सावकारे, लोकसभा सदस्य कल्याण काळे, जालना महानगर पालिकेच्या महापौर वंदना मगरे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, आमदार हिकमत उढाण, माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार अरविंद चव्हाण, माजी आमदार विलास खरात, वस्त्रोद्योग विभागाच्या सचिव शैला ए., छत्रपती संभाजीनगर, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, रेशीम संचालनालय संचालक नागपूर विनय मुन, पोलीस महानिरीक्षक विरेंद्र कुमार मिश्र, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया, महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा, पोलीस अधिक्षक तेघबीरसिंग संधु यांची उपस्थिती होती.

कापूस-सोयाबीनला रेशीम शेतीचा पर्याय
मागील अनेक वर्षांपासून शेतकरी कापूस आणि सोयाबीन या प्रमुख नगदी पिकांवर अवलंबून आहेत. या पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी शेतकऱ्यांना पर्यायी नगदी पिकांचा पर्याय देणे आवश्यक आहे. रेशीम शेती हा त्यासाठी अत्यंत चांगला पर्याय असून, अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही यातून चांगले उत्पन्न मिळविण्याची संधी आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना रेशीम शेतीकडे वळविण्यासाठी प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्पादनापासून वस्त्रनिर्मितीपर्यंत संपूर्ण मूल्यसाखळी
केवळ रेशीम उत्पादन करून उपयोग नाही, तर त्यापुढील प्रक्रिया, धागानिर्मिती, वस्त्रनिर्मिती, साडी विणकाम, ब्रँडिंग आणि बाजारपेठ अशी संपूर्ण मूल्यसाखळी उभारणे महत्त्वाचे आहे. जालन्यात या दिशेने विविध प्रयोग सुरू आहेत. स्थानिक पातळीवर रेशीम वस्त्रनिर्मितीला चालना मिळाल्यास शेतकरी, महिला, विणकर, व्यापारी आणि युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

जालन्यातील सिल्कच्या उत्पादनांना ‘जालनाई’ ब्रँडने ओळखले जाईल:
जालन्यातील महिलांनी रेशीमपासून साडी विणकाम सुरू केले असून त्यांचे कौशल्य आणि तयार होणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता उल्लेखनीय आहे. या महिलांना अधिक प्रशिक्षण, कौशल्यविकास आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास रेशीम वस्त्रनिर्मितीला मोठी चालना मिळू शकते. पैठणीला जशी स्वतंत्र ओळख मिळाली, त्याच धर्तीवर पालकमंत्री पकंजा मुंडे यांनी सुचविल्यानुसार जालन्यात तयार होणाऱ्या सिल्कच्या उत्पादनांना ‘जालनाई’ या स्वतंत्र ब्रँडने ओळखले जाईल अशी घोषणा करुन, ‘जालनाई’ ब्रॅन्ड लोगोचे विमोचन केले.
ज्याप्रमाणे पैठणी साडी जगप्रसिद्ध आहे, त्याच धर्तीवर स्थानिक महिलांच्या कौशल्याच्या जोरावर ‘जालना सिल्क’ ला देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठा ब्रँड म्हणून विकसित केले जाईल असे त्यांनी सांगितले.

ड्रायपोर्टमुळे निर्यातीला मिळणार चालना
जालना येथे ड्रायपोर्ट सुरू झाल्यामुळे रेशीम उत्पादनाला देशांतर्गत बाजारपेठे बरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. एकेकाळी भारत जगाला रेशीम निर्यात करणारा देश होता. आता पुन्हा भारताने जागतिक रेशीम बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जालना येथील रेशीम बाजारपेठ आणि ड्रायपोर्ट या दृष्टीने महत्त्वाची पायाभूत सुविधा ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आणि कौशल्यविकासावर भर
रेशीम उद्योगाचा विस्तार करण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. रेशीम उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान, प्रक्रिया, गुणवत्ता, बाजारपेठ आणि मूल्यवर्धन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच प्रशिक्षणासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करावा. कौशल्यविकासाच्या माध्यमातून शेतकरी आणि महिलांना या संपूर्ण मूल्यसाखळीत सहभागी करून घेण्यावर आगामी काळात भर दिला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गुन्हेगारीवर वचक आणि जलद न्याय
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रभावी तपास आणि जलद न्यायप्रक्रिया आवश्यक असून, अलीकडील एका गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी अल्पावधीत आरोपपत्र दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया गतिमान केल्याबद्दल त्यांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण होण्यासाठी अशा प्रकारची जलद आणि प्रभावी कार्यवाही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार अर्जुन खोतकर म्हणाले की, जालन्यात रेशीम (कोष) खरेदी केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे आता शेतकरी बांधवांना न्याय मिळाला असून, पूर्वी रेशीम कोष विक्रीसाठी हजारो किलोमीटर दूर जावे लागणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे. आता जालन्यासाठी ‘टेक्सटाईल पार्क’ मंजुर करण्याची मागणी केली. प्रारंभी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जालना जिल्ह्यातील रेशीम शेती व उद्योगातील संधीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती सादर केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत रेशीम उत्पादक शेतकरी आणि रेशीम खरेदी करणारे व्यापारी यांच्यातला पहिला रेशीम कोष लिलाव करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या हस्ते घंटानाद करून पहिला रेशीम कोष लिलाव प्रक्रिया  झाली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी घनसावंगी तालुक्यातील शेतकरी श्री. भागवत पंडीतराव भानुसे आणि श्री. भाऊसाहेब दत्ता निवदे यांचा सपत्नीक सत्कार केला. तसेच गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी अल्पावधीत आरोपपत्र दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया गतिमान राबविल्याबद्दल सरकारी वकील श्रीमती मुकीम यांचा सत्कार केला. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते अंबड येथील नवीन पोलिस स्टेशन इमारत आणि जिल्हा परिषद जालना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र रांजणी, राणी उंचेगाव, पिंपरखेड बु., दुधना काळेगाव, हसनाबाद, शहागड, वाकुळणी या सात नविन इमारतीचे ऑनलाइन लोकार्पण करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, उपसंचालक महेंद्र ढवळे, रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता डी.एन. कोल्हे, जिल्हा रेशीम अधिकारी वाखारे, रेशीम विकास अधिाकरी शंकर बराट, शेतकरी, व्यापारी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांची उपस्थिती होती.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *